महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० मे । सध्या उन्हाचा चटका वाढत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. वाढत्या उन्हासोबतच डोळ्यांच्या ॲलर्जीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. कडक उन्हाच्या झळांनी चाळीशी पार केली आहे. उन्हाचा उष्ण प्रकोप नागरिकांच्या आरोग्यावर दिसुन येत आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास वाढला होत आहे.

उष्माघातापासून बचावासाठी नागरिक कूलर, शीतपेयचा आधार घेत आहेत. सध्या तीव्र उन्हामुळे सगळीकडेच वातावरण तापले आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्या सोबतच विविध आजार व शारीरिक समस्याही डोके वर काढत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे डोकेदुखी, थकवा, डिहायड्रेशन, उष्माघात, डोळ्याचे विकार, मळमळ उलटी होणे व त्वचेसंबंधी विविध आजाराचे रुग्ण संख्या सध्या वाढली आहे.
गरम उष्णतेमुळे शरीरातून प्रचंड घाम बाहेर निघून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशक्तपणा वाढतो व डिहायड्रेशनचा त्रास सुरु होतो. शरीरातील पाण्याच्या कमतरतेसोबत मिनरल्स देखील उन्हाच्या दिवसात कमी होतात. या दिवसात स्वतःचा बचाव करणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
अंगाची लाही-लाही करणाऱ्या अशा उष्णतेमुळे डोळ्यांची ॲलर्जी वाढत आहे. सूर्याच्या तीव्र अतीनिल किरणांमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवत असून डोळे लाल होणे, खाज सुटणे, डोळे गरम जळणे, डोळे कोरडे होणे इत्यादी त्रास होत आहेत. सध्या तापमानात लक्षणीय वाढ होऊन शरीराचे तापमान सुद्धा वाढत आहे. त्यामुळे तहान अधीक प्रमाणात लागते. ऊन लागले असता डोके दुखते, मळमळ होऊन उलटी होते. मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होऊन बेशुद पडण्याची स्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीत यथा योग्य चिकित्सकीय सल्ला घ्यावा.