पुणे-सातारा वेगवान प्रवासासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मे । खंबाटकी टि्वन ट्यूब टनेलचे काम दिलेल्या डेडलाइननुसार फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता 2023 उजाडले तरीसुध्दा येथील काम पूर्ण झालेले नाही. याउलट जून 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुणे-सातारा या दरम्यानच्या वेगवान प्रवासासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

खंबाटकी घाटातील अपघात कमी करण्यासाठी आणि वाहनांच्या वेगवान प्रवासासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार एनएच-4 या मार्गावर टि्वन टनेल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 28 फेब्रुवारी 2019 रोजी या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सुरुवात केली.

मे. गायत्री प्रोजेक्ट लि.-क्रिसेंट ईपीसी प्रोजेक्ट अँड टेक्निकल सर्व्हिस लि. या ठेकेदारांमार्फत याची कामे सुरू आहेत. मात्र, मध्यंतरीच्या काळात ठेकेदार आर्थिक चणचणीत सापडल्याने या कामाला विलंब झाला होता. मात्र, आता स्थिती पूर्ववत झाली आहे. यामुळे येथील कामाचा वेग वाढवून टनेलची कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

असा आहे प्रकल्प…
प्रकल्प खर्च – 493 कोटी रुपये
प्रकल्पाची लांबी – 6.46 किमी
टनेल उंची – 9.31 मीटर
टनेल रुंदी – 16.16 मीटर
प्रकल्प सुरुवात – वेळे गाव
प्रकल्प शेवट – खंडाळा गाव
प्रकल्प सुरुवात – 28 फेब्रुवारी 2019
प्रकल्पाचा कालावधी – 36 महिने
एलिव्हेटेड व्हायाडक्ट – 1 किमी (खंडाळ्याच्या दिशेने)
दोन्ही टनेल – 3 पदरी

कामाची सद्य:स्थिती काय?
दोन्ही टनेलचे खोदकाम पूर्ण
अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे
एलिव्हेटेड रस्ता पीअर कॅप्सचे काम अंतिम टप्प्याकडे
अंतर्गत क्रॉस-वे बनविणार

खंबाटकी घाटातील टि्वन टनेल प्रकल्पाचे काम 53 टक्के पूर्ण झाले आहे. 493 कोटींच्या या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये हाती घेण्यात आले होते. ते पूर्णत्वास जात आहे. सर्व कामे जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे.

– संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *