महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मे । आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला असून चेन्नई, लखनौ, गुजरात आणि मुंबई या चार संघांनी प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या संघांमधील टीम इंडियाचे शिलेदार आता (दि. 23) जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या मोहिमेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत.
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यान 7 जूनपासून ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेची फायनल रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधून मोकळे झालेले काही खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत. यामध्ये विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि रविचंद्रन अश्विन या 7 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. टीम इंडियासोबत तीन नेट बॉलर्स जाणार आहेत. यात अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे. हिंदुस्थानी संघाने सलग दुसऱयांदा जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गतवेळी हिंदुस्थानला न्यूझीलंडकडून पराभव झाल्यामुळे उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.
कर्णधार रोहित शर्मा नंतर जाणार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे रोहितला आताच इंग्लंडच्या मोहिमेवर जाता येणार नाही. रोहित शर्मा हा हिंदुस्थानच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. आयपीएलची फायनल 28 मे रोजी आहे. त्यामुळे रोहित टीम इंडियातील उर्वरित खेळाडूंसह 29 मे रोजी लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे.