पुण्यात तळीरामांची संख्या वाढतेय ; एकाच वर्षात तब्बल 16 कोटी लिटर दारु रिचवली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मे । पुणे विभागातील नागरिकांनी देशी-विदेशी आणि बिअर असे मिळून सुमारे 16 कोटी 52 लाख 55 हजार लिटर मद्य एकाच वर्षात (2022-23) रिचवले. विशेष म्हणजे देशी-विदेशी मद्यापेक्षा बिअर घेण्याकडे अधिक ओढा आहे. विभागात तळीरामांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागांतर्गत पुणे, नगर आणि सोलापूर हे तीन महसुली जिल्हे समाविष्ट आहेत. या तीन जिल्ह्यांतील नागरिकांनी देशी-विदेशी तसेच बिअर या प्रकारातील किती लिटर मद्य रिचवले, याची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. मागील तीन वर्षांतील आकडेवारी पाहिली असता दरवर्षी एक ते दोन कोटींनी मद्य पिणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. मद्य पिण्यात बिअरची आकडेवारी विदेशी आणि देशी मद्यापेक्षा जास्त आहे.

विदेशी मद्य विक्रीत 13 टक्क्यांनी वाढ
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये 4 कोटी 30 लाख 30 हजार विदेशी मद्याची विक्री झाली होती. मागील वर्षी (2021-22) 3 कोटी 48 लाख 99 हजार, तर 2020-21 मध्ये 3 कोटी 17 लाख 15 हजार लिटर मद्य विक्री झाली होती. तीनही वर्षांचा विचार केला असता 23.30 टक्के असलेली विक्री 35.68 टक्क्यांवर पोहचली आहे. म्हणजेच, तीन वर्षांत सुमारे 13 टक्क्यांनी विदेशी मद्य विक्री तसेच पिणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

देशी मद्यपींची संख्या 8 टक्क्यांनी वाढली
देशी मद्य पिणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले असून, सन 2022-23 मध्ये विभागात 5 कोटी 51 लाख 52 हजार लिटर देशी मद्य नागरिकांनी रिचवले आहे. मागील वर्षी (2021-22) 5 कोटी 11 हजार, 2020-21 मध्ये 4 कोटी 67 लाख 14 हजार लिटर मद्य रिचवले गेले होते. मागील दोन वर्षांत 10.27 टक्क्यांवरून हे मद्य घेणार्‍यांचे प्रमाण 18.62 टक्क्यांवर पोहचले आहे. म्हणजेच, 8 टक्क्यांनी देशी मद्य पिणार्‍यांची संख्या वाढलेली आहे.

बिअर घेण्याचे प्रमाण सर्वाधिक
पुणे विभागात देशी-विदेशी मद्यापेक्षाही बिअर रिचवणार्‍या नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. 2022-23 या सालात पुणे विभागात 6 कोटी 70 लाख 75 हजार लिटर बिअर रिचवली आहे. मागील वर्षी (2021-22) 4 कोटी 41 लाख 20 हजार, तर 2020-21 मध्ये 4 कोटी 14 लाख 53 हजार लिटर बिअर फस्त केली आहे. मागील वर्षी 59.87 टक्के लिटर बिअर नागरिकांनी रिचवली, तर हेच प्रमाण यापूर्वी 49.98 टक्के एवढे होते.

मद्यातून तिजोरी फुल्ल
वर्ष मिळालेला महसूल
2022-23 45 कोटी 78 लाख
2021-22 37 कोटी 90 लाख
2020-21 32 कोटी 67 लाख
(आकडे रुपये कोटीत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *