काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन ; वयाच्या 47व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० मे । राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा आप्त परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांना चंद्रपूरहून एअर अ‌ॅम्बुलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. आज एअर अ‌ॅम्बुलन्सने त्यांचे पार्थिव वरोरा येथे दुपारी 2 वाजता आणण्यात येईल. त्यानंतर अंतिम संस्कार दुपारी 4 वाजता वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होणार आहे.

नुकतेच वडिलांचेही झाले निधन

27 मेरोजी बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली. आजारपणामुळे 28 मेला वडिलांच्या अंत्यविधीमध्येही बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नव्हते. चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला होता. सुरुवातीला बाळू धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथे उपचारासाठी नेण्यात आले.

नागपुरात किडनी स्टोनची शस्त्रक्रिया

शुक्रवारी 26 मे रोजी बाळू धानोरकर यांना किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ताणतणावामुळे प्रकृती बिघडली

शनिवार 27 मे रोजी बाळू धानोरकर यांच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर धानोरकर यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तीनच दिवसांत धानोरकर यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी नंतर झालेला वाद, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्यावर झालेला गोळीबार, साळा प्रवीण काकडे यांना चौकशीसाठी आलेली ईडीची नोटीस आदींमुळे आलेला ताणतणाव आणि सततच्या धावपळीमुळे खासदार धानोरकर यांची प्रकृती बिघडली होती.

कोण आहेत बाळू धानोरकर?

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत. धानोरकर यांचा जन्म 4 जून 1975 ला यवतमाळ जिल्ह्यात झाला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे वाटत असतानाच बाळू धानोरकर यांनी अनपेक्षित विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. चंद्रपूरच्या मतदारसंघात त्यांनी चक्क केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती. या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले होते. त्यामुळे अनेकदा बाळू धानोरकर हे नाव चर्चेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *