महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० मे । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल)ने विविध विभागाच्या तब्बल 17 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदापासून ‘मोबाईल अॅप’ आणणार आहे. प्रवेशाची नोंदणी, कागदपत्र अपलोड, प्रवेश फेरीपर्यंत सर्व प्रोसेस विद्यार्थ्यांना आता घरबसल्या करता येणार आहे. अॅपची तयारी अंतिम टप्यात असून जूनच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे.
सीईटी सेलच्या माध्यमातून सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सीईटी सेलच्या माध्यमातून होत असलेल्या तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या 8, कला शिक्षण अंतर्गत असलेल्या 1, उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या 8 अशा 17 व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा पार पडल्या आहेत. सर्व अभ्यासक्रमांसाठी सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी एमएचटी सीईटी सर्व अभ्यासक्रमांचे निकालही जाहीर झाले आहेत. यामुळे लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रथम नोंदणी करण्यापासून ते विविध कागदपत्रे अपलोड करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया यानंतर प्रवेश फेरीतील पसंतीक्रमही भरता येतील अशी सुविधा या अॅपच्या माध्यमातून दिली जाईल, अशी माहिती आयुक्त महेन्द्र वारभुवन यांनी दिली.
हे टाळता येणार
1. विद्यार्थ्यांना मोबाईल प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याने वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरताना होत असलेल्या चुका टाळता येणार आहेत. आर्थिक भुर्दंडही कमी होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक सोयीचे ठरणार.
2. विद्यार्थी अनेकदा जवळच्या एफसी (फॅसिलिटेशन सेंटर) स्वीकृत केंद्रावर जाऊन अर्ज भरतात. अनेकदा एफसी सेंटरवर एकाच महाविद्यालयातील पसंतीक्रम अर्जात टाकला जातो. त्यामुळे प्रवेशावेळी तक्रारी निर्माण होतात. विद्यार्थ्यांना मोबाईलवर अर्ज दिसणार असल्याने गोंधळ दूर करता येईल.
