महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जुन । किल्ले रायगडावर एक जून ते सात जून दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आजपासून विविध लोककला सादर केल्या जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व शिवप्रेणींनी पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जाणता राजा’ महानाट्य
याशिवाय, 1 जून ते 7 जून या काळात गेट वे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. 1 जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, 2 जून रोजी राजस्थानी लोककला, 3 व 4 जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच 5 ते 7 जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच 1 ते 7 जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
विनामूल्य सन्मानिका उपलब्ध
350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असतील.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतीक मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थित राहणार आहेत.