![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जुन । राज्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक जे. जे. रुग्णालयात सामूहिक राजीनाम्याचा बॉम्ब फुटला असून ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासह एकूण ९ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे वर्षभरापासून मानसिक त्रास देत होत्या, अशा प्रकाराचा गंभीर आरोप राजीनामा दिलेल्या डॉक्टरांनी केला आहे.
राजीनामा दिलेले ज्येष्ठ डॉ. लहाने, रागिणी पारेख यांच्यासह नऊ डॉक्टरांनीही संयुक्त निवेदन जारी केले आहे. मार्ड संघटनेच्या माध्यमातून २८ निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीवरून डॉ. अशोक आनंद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यावर आक्षेप घेण्यात आला. डॉ.आनंद यांच्यावर एका महिलेने छेडछाडीचा आरोप केल्यावर डॉ. रागिणी पारेख यांनी या प्रकरणाचा तपास केला. तसेच डॉ. आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अनेक डॉक्टरांविरुद्ध अॅट्रॉसिटीअंतर्गत पोलिसांकडे तक्रार केली होती.
अधिष्ठाताने त्रास देण्यासाठी जाणूनबुजून डॉ. आनंद यांना चौकशी समितीचे अध्यक्ष केले आहे, असा आरोप राजीनामा दिलेल्या डॉक्टरांनी केला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या ज्येष्ठ डॉक्टरला त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करायला सांगून ७ लाख रुपयांचा दंड ठोठावल्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये जे.जे रुग्णालयात अनेकदा रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याचा दोषही डॉक्टरांवरच लावण्यात येतो. एकूणच डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करावे की इतर समस्यांचे निराकरण करावे, असा प्रश्न नेहमीच पडत असल्याचे पाहण्यात येते.
डॉ. पल्लवी सापळे यांचे कानावर हात
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजितसिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना आणि डॉ. हमालिनी मेहता यांनी सापळेंवर निवासी डॉक्टरांना भडकावून संपावर जाण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राजीनामे दिलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून नेत्र विभागाकडून खुलासा मागवण्यात आला होता, पण त्याचा अहवाल येण्यापूर्वीच डीनने चौकशी समिती स्थापन केली.
