वारकऱ्यांसाठी गोड बातमी; मुख्यमंत्र्यांनी तुमच्या फायद्याचा घेतला निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुन । पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये म्हणून चोख नियोजन करण्याचे आदेश गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. पंढरपूर आषाढी वारीसाठी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाचवरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीसवरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले. वारीच्या मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी दुप्पट केला असून, तो तत्काळ वितरित करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत, यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्यावी, वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवावी, औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्यसुविधा याबाबत वेळीच नियोजन करावे आदी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये, यासाठी पोलिस विभागाने स्टिकर किंवा पासच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे, पालखी मार्गावरील टोल नाके सुरू होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *