महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुन । काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. त्यात त्यांनी ‘शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर अमित शाह यांनीच फोडली’ या खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने शिवसैनिकांची मने दुखावली. त्यामुळेच हे बंड घडले. उलट ठाकरेंनी मोदींच्या नेतृत्वाखाली २०१९ ची निवडणूक जिंकली व मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससोबत जाऊन बसले,’ असा हल्लाबोल शाह यांनी केला.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने देशभर जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत राज्यातील शाहांची पहिली सभा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये झाली. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती.
शाह म्हणाले, काँग्रेसच्या चार पिढ्या करू शकल्या नाहीत तेवढे काम मोदी यांनी केले आहे. यूपीएचे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार होते. पण नऊ वर्षांत आमच्यावर विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाहीत. हे पारदर्शक सरकार आहे. जगभरात नरेंद्र मोदींना प्रतिसाद मिळत आहे. उलट राहुल गांधी यांना देशात कोणीही ऐकत नाहीत, म्हणून ते देशाबाहेर जाऊन विरोधात बोलत आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे व आमचे जो जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री असेल, असे ठरले होते, परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तीन तलाक कायदा, मुस्लिम आरक्षण, राम मंदिर, समान नागरी कायदा याबाबत ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हानही शाह यांनी दिले.
अशोकरावांची मजल टूजी, थ्रीजी, सोनियाजीपर्यंतच
नऊ वर्षांत आमच्याकडे सांगण्यासारखे भरपूर आहे. परंतु अशोकराव चव्हाण तुमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. तुमची मजल टूजी, थ्रीजी व सोनियाजी यांच्यापलीकडे जाणार नाही. जालना-नांदेड समृद्धी मार्गाची तुम्ही घोषणा केली, पण कवडीची तरतूद केली नाही. आम्ही निधीची तरतूद करून काम सुरू केले आहे, असा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त जागा निवडून आणण्यासाठी आमची स्पर्धा आहे. ४५ खासदार आम्ही निवडून आणू, असेही ते म्हणाले.
