शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच उद्धव ठाकरेंना धक्का, पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांचा राजीनामा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुन । शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन उद्या सोमवारी (ता. 19) आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केले आहे. त्यात ‘ठाकरे गटात माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे ‘फुकट’ गेली’, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

4 वर्षांत कोणतीही जबाबदारी मिळाली नाही
उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात शिशिर शिंदे यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे. पत्रात शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे की, 19 जून 1018 रोजी मी अतिशय आत्मीयतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यानंतर 4 वर्षांत 30 जून 2022 पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही. प्रत्येक कार्यकर्त्याची काही ओळख असते. कार्यकत्याच काही गुण असतात. परंतु या चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते.

केवळ शोभेचे पद मिळाले
शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे की, माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे “फुकट” गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून 2022 रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले. मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा व पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक नमूद करतो.

सहा महिन्यांत आपली भेट नाही
शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो. या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास ‘जय महाराष्ट्र’ करतो.

कोण आहेत शिशिर शिंदे?
राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांची साथ दिली होती. 2009 ला भांडुप विधानमतदार संघातून आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 19 जून 2018 ला शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली होती. घरवापसीनंतर तब्बल 4 वर्षे पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेते पदी वर्णी लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *