एकेकाळच्या विश्वविजेत्यांनी झिम्बॉब्वेसमोर टेकले गुडघे, वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये उलथापालथ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुन । वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात मोठी उलथा पालथ झालीय. दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजने झिम्बॉब्वेसमोर अक्षरश: लोटांगण घातले. झिम्बॉब्वेने शनिवारी वेस्ट इंडिजला 35 धावांनी हरवून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. तर वेस्ट इंडिजला वनडे वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बॉब्वेने प्रथम फलंदाजी करताना सिकंदर रजा आणि रेयॉन बर्ल यांच्या अर्धशतकानंतर 50 षटकात झिम्बॉब्वेने सर्वबाद 268 धावा केल्या. वेस्ट इंडिज काइल मेयर्सच्या अर्धशतकानंतरही 233 धावांपर्यंतच मजल मारू शकले.

वनडे वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये झिम्बॉब्वेने सलग तिसरा विजय नोंदवला आहे. ग्रुपमध्ये तीन विजयासह झिम्बॉब्वे अव्वल स्थानी असून ते सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत. तर वेस्ट इंडिज तीन पैकी दोन विजय आणि एका पराभवासह तिसऱ्या स्थानी आहेत.

नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बॉब्वेला फलंदाजीला पाचारण केलं गेलं. सिकंदर रजाने 68 धावा करताना बर्लसोबत 87 धावांची मोठी भागिारी केली. तर बर्लने 50 धावा करून महत्त्वाचे योगदान दिले. झिम्बॉब्वेचा संघ 250 धावात गुंडाळला असता पण शेवटच्या विकेटसाठी चटारा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी 25 धावांची भागिदारी केली. यामुळे त्यांची धावसंख्या 268 वर पोहोचली.

झिम्बॉब्वेने दिलेलं 269 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. काइल मेयर्सने 56 धावा केल्या. पण तो बाद होताच इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. शेवटी रॉस्टर चेजने 44 धावा फटकावत प्रयत्न केला, मात्र चटाराने त्याला बाद केल्यानंतर विंडिजच्या आशा संपुष्टात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *