महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुन । पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत 12 डबे रुळावरून घसरले. ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी तीन गाड्यांची धडक झाल्यानंतर 22 दिवसांतील हा दुसरा रेल्वे अपघात आहे. मात्र यामध्ये जीवित व वित्तहानी फारशी झाली नाही.
या धडकेच्या जोरदार आवाजाने ओंडा रेल्वे स्थानकाच्या आसपासचे लोक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच मालगाडीच्या लोको पायलटला सुखरूप बाहेर काढले.
रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने आद्रा-खड़गपूर सेक्शनमधील रेल्वे वाहतूक सुमारे दोन तास प्रभावित झाली होती.
मालगाडी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला धडकली
घटनास्थळी पोहोचलेले दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय सुरक्षा अधिकारी दिवाकर माझी यांनी पत्रकारांना सांगितले- ओंडा रेल्वे स्थानकावर एक मालगाडी आधीच उभी होती. मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. अखेर हा अपघात कसा झाला, हे तपासानंतरच कळेल. सिग्नल बिघाड झाला असावा.
मालगाडीचे इंजिन मालगाडीवर धडकले
अन्य एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, बांकुराहून विष्णुपूरला जाणारी एक मालगाडी ओंडा स्टेशनच्या लूप लाइनवर उभी होती. याच मार्गावर मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, मागील मालगाडीचे इंजिन समोरील मालगाडीवर चढले.
सीपीआरओ म्हणाले – 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, एक मालगाडी लूप लाइनमध्ये उभी होती आणि दुसरी ट्रेन सिग्नलवर थांबणार होती, पण ती रेड सिग्नलच्या पुढे गेली, ज्यामुळे हा अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. अपघातानंतर सकाळी 8.30 च्या सुमारास पहिली गाडी या मार्गावर धावली. आतापर्यंत 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
2 जून रोजी बालासोरमध्ये 292 लोकांचा मृत्यू झाला होता
2 जून रोजी ओडिशातील बालासोर येथे सिग्नल बिघाडामुळे तीन गाड्यांचा अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले. अनेकांवर अजूनही उपचार सुरू आहेत.