महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । नाशिक जिल्यात पावसाने बाजार समितीत भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत असून, सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत.
बाजारात कोथिंबिरीच्या जुडीने उच्चांक गाठला असून, दर १२० ते १७० रुपयांपर्यंत गेले आहेत. मंगळवारी बाजार समितीत कोथिंबिरीच्या जुडीसाठी शेकडा १२ हजार ते १७ हजार रुपये दर मिळाला. त्याचबरोबर मेथी आणि शेपूच्याही दरांत जुडीमागे पाच ते दहा रुपयांची वाढ झाली. गेले दोन महिने भाज्यांचे दर उतरलेले असल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता.
मात्र, सोमवारी जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांसह सर्व भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे बाजार समितीसह किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. बाजार समितीत गेल्या आठवड्यापर्यंत ४० ते ५० रुपयांना मिळणाऱ्या कोथिंबिरीच्या दराने उच्चांक गाठला असून, चांगल्या प्रतीच्या मोठ्या जुडीचा दर १७० रुपयांपर्यंत गेला आहे. त्याचबरोबर ३५ ते ४० रुपयांना मिळणारी मेथी आता ६० रुपयांवर पोहोचली आहे. शेपूची जुडीदेखील आता ३५ ते ४० रुपयांवर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात पालकचे दर घसरलेले असून, आवक घटल्यानंतरही हे दर स्थिर आहेत. पावसाचा तडाखा वाढल्यानंतर दरांत अधिक वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
टोमॅटोची लाली वाढली
पंधरा दिवसांपूर्वी बाजार समितीमध्ये टोमॅटोला पाच रुपये किलोप्रमाणेही दर मिळत नव्हता. मात्र, गेल्या आठवड्यापासून टोमॅटोची लाली वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी बाजार समितीत टोमॅटो ७० रुपये किलोवर गेला होता. त्याचबरोबर इतरही भाज्यांच्या दरात्ही ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.