स्कॉटलंडने झिम्बाब्वेला नमवत झिम्बाब्वेचे वर्ल्ड कप पात्रतेचे स्वप्न भंग केलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै । ख्रिस सोलने आपल्या पहिल्या चार षटकांतच जॉयलॉर्ड गम्बल, क्रेग एरव्हिन आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या सिन विल्यम्सला बाद करून झिम्बाब्वेची 3 बाद 29 अशी दुर्दशा केली आणि वर्ल्ड कप पात्रतेच्या स्वप्नांनाच सोलून काढले. स्कॉटलंडच्या 235 धावांचा पाठलाग करताना यजमान झिम्बाब्वेचा संघ 41.1 षटकांत 203 धावांवर आटोपला आणि स्कॉटलंडने 31 धावांच्या विजयासह वन डे वर्ल्ड पात्रतेच्या आपल्या आशा अधिक उंचावल्या. आता गुरूवारी स्कॉटलंड विरुद्ध होणार्या लढतीत नेदरलॅण्ड्सला 32 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. मात्र 31 पेक्षा कमी धावांनी विजय असल्यास जिंकूनही नेदरलॅण्ड्स स्पर्धेबाहेर फेकला जाईल आणि स्कॉटलंड हरूनही वर्ल्ड कपचा दहावा संघ ठरेल

स्कॉटलंडच्या 235 धावांचे माफक आव्हान यजमान झिम्बाब्वे सहजगत्या गाठेल, असे वाटत होते. पण फलंदाजीला उतरताच ख्रिस सोलने पहिल्याच चेंडूवर जॉयलॉर्डला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडले आणि मग दुसऱया षटकात कर्णधार क्रेग एरव्हिनच्या रूपाने झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मालिकेत दोन शतके आणि 3 अर्धशतके झळकवणाऱया अष्टपैलू सिन विल्यम्सचा त्रिफळा उडवत झिम्बाब्वेच्या स्वप्नांनाही उडवले. 4 बाद 37 अशा बिकट अवस्थेनंतर सिकंदर रझा आणि रायन बर्ल यांनी संघाची पडझड रोखत 54 धावांची भागी रचली. मग बर्लने वेस्ली मधेवेरच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 73 धावांची अफलातून भागी रचत झिम्बाब्वेच्या स्वप्नांना पुन्हा संजीवनी दिली. पण ही जोडी फुटताच झिम्बाब्वे पुन्हा धडपडला. रायन बर्लने संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्याला तळाच्या फलंदाजी साथ लाभली नाही. स्कॉटलंडने या संधीचा लाभ उठवत बर्लची झुंजार खेळी 83 धावांवर संपवत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आणल्या. अखेर सफयान शरीफने तेंडेई चटाराचा त्रिफळा उद्ध्वस्त करत आपल्या वर्ल्ड कप प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. 33 धावांत आघाडीच्या 3 फलंदाजांना टिपणारा सोलच स्कॉटलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याआधी आघाडीवीरांच्या छोटया पण दमदार फलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडने 50 षटकांत 8 बाद 234 अशी समाधानकारक मजल मारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *