![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जुलै । सध्या लगीनसराईचे दिवस सरले असले तरी येत्या विवाहाच्या मोसमासाठी खरेदीला सुरुवात झालेली आहे. पण, येत्या काही काळात सोनेखरेदीवर जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. कारण, येत्या सहा महिन्यांत सोन्याच्या किमतीत सुमारे 6500 रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या सोन्याच्या किमतीत 58 हजार ते 61 हजारांच्या दरम्यान चढउतार सुरू आहे. मात्र, या वर्षाचे उर्वरित सहा महिने सोन्याच्या किमती या चढ्याच राहतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसंच, सध्या 70 हजारांच्या घरात असणारी चांदी 90 हजार रुपये किलो इतकी होऊ शकते, असाही अंदाज आहे.
या दरवाढीची विविध कारणं सांगण्यात येत आहेत. त्याचं मुख्य कारण हे डी-डॉलरायजेशन असून जागतिक अर्थकारणात डॉलरच्या किमतीतली घसरण ही सोन्याचं महत्त्व वाढवणारी ठरणार आहे. तसंच, महागाई आणि त्यामुळे होणारी नोकरकपात या दोन कारणांमुळेही सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. अमेरिका, युरोप या खेरीज चीनच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम, जर्मनी, न्यूझिलंड अशा देशांमध्ये मंदीची अधिकृत घोषणा, अमेरिकेतील बँकांची स्थिती अशा अस्थिर आर्थिक वातावरणामुळे सोन्यासारख्या स्थिर आणि पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणुकीकडे कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वृद्धी होऊ शकते.
