महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । पुढील दोन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अनुकूल वातावरणामुळे आठवडाभर राज्याच्या बहुतांश भागात सक्रिय असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांपासून ओसरला होता. घाट माथ्यावरही पावसाच्या प्रमाणात घट झाली होती. पुण्यातही दोन दिवस हेच चित्र बघायला मिळाले. बुधवारी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रवात वाढल्याने उकाडा जाणवला. संध्याकाळी पाचच्या सुमारास आकाश ढगाळ झाले आणि शहराच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. तासाभराच्या हलक्या सरींनंतर पाऊस थांबला. रात्री साडेआठपर्यंत ३.४ मिलिमीटर पाऊस झाला. शहरात बुधवारी दिवसभरात कमाल ३०.८ आणि किमान २२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घाट माथ्यावर ताम्हिणी, मुळशी, लोणावळा, वेल्हे भागांत जोराचा पाऊस पडला. घाट माथ्यावरील पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घाट माथ्यावरील भटकंती टाळावी, असे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात आले आहे.
केरळमध्ये मुसळधार पाऊस
केरळमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असून, राज्यात विविध नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे; तसेच धरणे भरून वाहू लागली आहेत. मुसळधार पावसाने काही ठिकाणी झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. पावसाने आलेल्या पुरात दोन जणांचा बळी गेला. आणखी १२ ते १४ तास मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, १२ जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. कोल्लम आणि तिरुअनंतपुरम हे दोन जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.