महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । समृद्धी महामार्गावर लेनचा नियम ताेडून भरधाव धावणारी ट्रॅव्हल उलटून लागलेल्या अागीत २५ जणांचा हाेरपळून मृत्यू झाला हाेता. बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळखुटानजीक १ जून राेजी झालेल्या या भीषण अपघाताला शुक्रवारी आठ दिवस झाले. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या टीमने समृद्धीवर जाऊन आठ तासांत सुमारे १५० किलोमीटर महामार्गाचे सर्वेक्षण केले. तेव्हा सुमारे ८० टक्के वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे समोर आले.
‘दिव्य मराठी’ टीमने समृद्धी महामार्गावरील माळीवाडा ते जालना दरम्यान वाहनांची पाहणी केली. समृद्धीवर दर तीन मिनिटाला एक ट्रक लेनची शिस्ता मोडतो. १२० ची वेगमर्यादा असून देखील तब्बल १५० च्या वेगाने वाहने चालवली जातात. वेगावर िनयंत्रण ठेवणे, वाहनांच्या तपासणीसाठी महामार्ग पाेलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत ४५० अपघात झाले असून ९६ जणांचा बळी गेला आहे.
एक्झिट, पेट्राेल पंप कुठे अाहे, विचारण्यासाठी काॅल
एमएसआरडीसीने समृद्धीसाठी १८००२३३२२३३ हा हेल्पलाइन नंबर दिला आहे. याचे मुख्य केंद्र सावंगी टोलनाक्यावर आहे. या केंद्रावर रोज १५० काॅल येतात. बहुतांश लोक एक्झिट गेटची विचारणा करतात. गाडी खराब झाली, पेट्रोल पंप, फूड मॅाल कुठे आहे, असे विचारणारे अनेक कॉल येतात, अशी माहिती क्यूआरव्हीचे विभागीय अधिकारी आशिष फरांदे यांनी दिली.
या गोष्टींची अंमलबजावणी आवश्यक
टायरचे संपूर्ण घर्षण तरीही महामार्गावरून सर्रास प्रवास. अशा वाहनांना महामार्गावर येण्यास बंदी अाहे. टोल नाक्यावर याची तपासणी व्हावी.
महामार्गावर सुविधा केंद्र नसल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे काही किलोमीटर अंतरावर गॅरेज किंवा मोबाइल व्हॅनमध्ये गॅरेजची सोय असावी.
समृद्धीवरील एका नाक्यावरून रोज किमान अडीच ते तीन हजार गाड्या ये-जा करतात. यातील एकाही वाहनाची तपासणी होत नसल्याचे पुढे आले. एमएसआरडीसीने गाड्यांची तपासणी करण्यासाठी आरटीओकडे जबाबदारी दिली आहे, परंतु तपासणी होताना दिसली नाही.
मद्यप्राशन करून समृद्धीवर वाहन चालवल्यामुळे अनेक अपघात झाले अाहेत. आठ दिवसांपूर्वी बुलडाण्याजवळील ट्रॅव्हल्स अपघातातदेखील चालकाने मद्यसेवन केल्याचे समोर आले आहे. मात्र, याची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ब्रीथ अॅनालायझर नाही.
नियम माेडणाऱ्यांना माेठा दंड गेल्या सहा महिन्यांत जालना जिल्ह्याच्या हद्दीत १ हजार ३१० आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत ३ हजार ६४५ अशा एकूण ४ हजार ९५५ वाहनांनी वेगमर्यादा अाेलांडली. त्यांना पोलिसांनी ६४ लाख १५ हजार ४०० रुपये एवढा दंड ठोठावला.
आरटीओकडे वाहनांच्या तपासणीची जबाबदारी
आरटीओने टोलनाक्यावर न थांबता समृद्धी महामार्गावर फेरी मारून वाहनधारकांची तपासणी करावी. प्रत्येक टोलनाक्यावर प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची कसून तपासणी केली पाहिजे.
– रामदास खलसे, प्रकल्प संचालक, एमएसआरडीसी