राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार व शरद पवार येणार एकाच मंचावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी फोडली. ते त्यांच्या समर्थकांसह शिंदे भाजप सरकारमध्ये सामिल झाले आहेत. तेव्हापासून अजित पवार गटाकडून शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजित पवार व शरद पवार यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या सर्व फोडाफोडीला एक आठवडा झाला असून अद्याप दोन्ही नेते एकमेकांसमोर आलेले नाहीत. मात्र येत्या 1 ऑगस्टला पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात शरद पवार व अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर असणार आहेत.


लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

लोकमान्य टिळकांच्या 103व्या पुण्यतिथी दिवशी मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार नरेंद्र मोदींना दिला जाणार आहे. आतापर्यंत एस. एम. जोशी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ.मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शरद पवार, डॉ. सायरस पूनावाला, राहुल बजाज आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *