महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर (Himachal Pradesh and Jammu Kashmir) खोऱ्याला सफरचंदांचे (Apple) आगर म्हणून ओळखले जाते; मात्र वायव्य (उत्तर-पश्चिमी) प्रांतात झालेल्या मोठ्या पावसामुळे तयार झालेल्या सफरचंदांचा बागा नष्ट झाल्या. परिणामी, ५० टक्के उत्पादनात घट आली.
यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर भागातून यावर्षी देशाला सफरचंदांचा पुरवठा कमी होणार आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kolhapur Agricultural Produce Market Committee) हिमाचल प्रदेश प्रांत, नवी मुंबई कृषी उत्पन्न समितीतून एक दिवस आड येणाऱ्या सफरचंदांच्या आवकेवर परिणाम होणार आहे.
आवक कमी आणि मागणी जास्त झाल्याने सफरचंदांचे प्रति किलोच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुर्की, वॉशिंग्टन, युरोपियन देशातून येणाऱ्या सफरचंदांपेक्षा हिमालच प्रदेश, काश्मिरी सफरचंद चवीला गोड, कुरकुरीत असते. ज्युसही बनविता येतो. या सफरचंदाला ग्राहकांकडून अधिक मागणी असते.
परदेशातून येणाऱ्या सफरचंदांवर आयात कर भरावा लागतो. त्यामुळे सफरचंदाच्या प्रतिकिलो दरात वाढ होते. तुलनेने हिमालचलमधून येणारे सफरचंद स्वस्त मिळते. गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर भागात प्रचंड पाऊस झाला. भूस्खलनामुळे अनेक बागा जमिनीत गाडल्या गेल्या. काही बागा पुरातून वाहून गेल्या. झंझावाती वाऱ्यामुळे फळे विखुरली गेली. जी सफरचंदे झाडांवर उरली, त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. पावसामुळे फळेही कुजली.
दिवसाआड एक ट्रक सफरचंद कोल्हापुरात
जम्मू-काश्मीर खोऱ्यात दरवर्षी २.१ ते २.९ दशलक्ष टन उत्पादन होते. या खोऱ्यातून ७५ टक्के सफरचंद हे देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी येते. ॲपल ग्रोवर्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्था सफरचंदांचे मार्केटिंग, वितरण करते.
तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून राज्यातील अन्य भागात सफरचंदांचे वितरण होते. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्याला एक दिवस आड सफरचंद घेऊन ट्रक येतो. या ट्रकमध्ये ५५०/६०० बॉक्स असतात. या बॉक्समध्ये शंभर ते ३१० सफरचंदांचा समावेश असतो.