महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यातील तळेगाव येथे निधन झालं. त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला कळवण्यात आलं. मुलगा गश्मीर महाजनीला कळल्यानंतर तो त्वरित पुण्याला आला. त्यानंतररवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. महाजनी यांचा मृत्यू 2 दिवसांआधी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. पण मृत्यू नेमका कसा झाला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अभिनेत्याचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
रवींद्र महाजनी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या बॉडीवर कोणत्याही तीष्ण खुणा नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. बॉडी बऱ्यापैकी डीकंपोज झाल्याचं प्राथमिक तपासणीत आढळून आलंय. साधारण दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असं अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाजनी यांचा अंतिम शवविच्छेदनाचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. अंतिम रिपोर्ट आल्यानंतर महाजनी यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात येईल. यांच्या पार्थिवावर काही वेळातच पुणे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रवींद्र महाजनींच्या सोसायटीत कचऱ्या गोळा करणाऱ्या आदिका वारंगे यांनी त्यांना मंगळवारी शेवटचं पाहिलं होतं. त्या म्हणाल्या, “मी इमारतीत कचरा गोळा करायचे. त्यांच्याकडून पाण्याची बाटली घ्यायचे आणि त्यांना पुन्हा नेऊन द्यायचे. मंगळवारी त्यांनी स्वत: माझ्या हातात कचऱ्याची पिशवी दिली होती. कचरा घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले की मी त्यांचा दरवाजा ठोठवायचे. बुधवारी माझी सुट्टी होती. गुरूवारी सकाळी त्यांचा दरवाजा ठोठावला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मी दुपारीही त्यांच्या घरी गेले पण तेव्हाही दरवाजा बंद होता”.
रवींद्र महाजनी हे पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबी इथल्या क्सर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. त्यांनी तिथला 311 नंबरचा भाडेतत्त्वावर घेतला होता. मागील 8-9 महिने ते तिथे राहत होते. मुलगा गश्मीर महाजनी आणि पत्नी मुंबईत राहत आहेत.