महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भुकंप झाला. यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अर्थखात्याची जबाबदारी देखील देण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी कार्यकाळाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर विकास निधीचा वर्षाव केला आहे.
अजित पवारांच्या प्रत्येक आमदाराला विकासकामांसाठी भरभरुन निधी मिळाला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना विकासकामांसाठी तब्बल 25 कोटीहुन अधिक निधी दिला आहे. अर्थ खात्याची सूत्रे अजित पवारांच्या हाती येताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.
विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजित पवारांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी समाजमाध्यमातून जाहीर केलं आहे.
