राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही गट-तट नाहीत, अजित पवार यांचा दावा दुर्दैवी : शरद पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत नऊ मंत्रिपदे मिळवली. आता अजितदादांकडे ३५ ते ४० अामदार असल्याचा दावा ते करत आहेत, तर शरद पवारांकडे फक्त १० ते १२ आमदारच उरले आहेत. इतकेच नव्हे तर अजितदादांनी पक्षावर दावा ठोकला असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तसे पत्र पाठवले होते. त्यानुसार आयोगाने दोन्ही गटांना नोटिसा बजावल्या. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीत कुठलेही गट-तट नसून अजित पवार यांचा दावा दुर्दैवी व अकाली असल्याचा युक्तिवाद केला.

राष्ट्रवादीत प्रत्यक्ष फूट पडल्याचे दिसत असले तरी विधिमंडळात अद्याप दोन गटांत पक्षाची विभागणी झालेली नाही. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत राष्ट्रवादी हा एकच पक्ष म्हणून नोंद आहे. फक्त वेगळी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांसह ९ मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले आहे. त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, निवडणूक आयोग आता अजितदादा गटालाही पक्षावर दावा करण्याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगू शकतो.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडताना पक्षावर दावा केला होता. त्यांच्यासोबत सर्वाधिक आमदार, खासदार असल्याने आयोगाने शिंदेना पक्ष व चिन्ह दिले.
अजितदादांनी त्याच पॅटर्ननुसार ३० जूनच्या बैठकीत आपली पक्षाच्या प्रमुखपदी निवड झ‌ाल्याचा दावा केला. तसेच २०२२ मध्ये शरद पवारांची झालेली निवड ग्राह्य धरता येणार नाही. कारण त्या बैठकीचे पुरावे नसल्याचे अजितदादा गटाने आयोगाला लेखी दिले आहे. सध्या दादांकडे सर्वाधिक आमदार आहेत. म्हणून दादांचे पारडे सध्या जड आहे.

काय आहे पवारांचा युक्तिवाद? :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे अजित पवार यांच्या याचिकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळावी.
एक जुलै २०२३ पूर्वी अजित पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात किंवा इतर नेत्याविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. शरद पवार किंवा पक्षाच्या बैठकीत कुठल्या मुद्द्यावर विरोधही व्यक्त केला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *