महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । मोदी सरकारवर काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत चर्चा सुरू झाली. त्यात मणिपूरचा मुद्दा महत्वाचा आहे. या शिवाय आपापल्या राज्यातील महत्वाचे प्रश्न किंवा मुद्दे मांडण्याचीही मोठी संधी खासदारांना आहे. पण शिवसेनेतील दोन्ही गटाच्या खासदारांनी राजकीय भांडणेच या चर्चेत चव्हाट्यावर आणली. मूळ मुद्दा सोडून परस्परांवर टीका करण्यात, उणीदुणी काढण्यात त्यांनी वेळ घालवला. एकत्रित शिवसेनेचे माजी नेते, आता भाजपचे केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे आणि उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी तर एकमेकांचा एकेरी उल्लेख करत मराठी संस्कृतीचे नवे दर्शन देशाला घडवले, असे दिसून आले. डॉ. श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालिसा पठण केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी मात्र केंद्र सरकारवर मुद्देसूद चौफेर हल्ला केला.
उद्धव ठाकरे गटाला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही : राणे
सावंतांचे भाषण ऐकल्यावर वाटले की, ते संसदेत नव्हे तर महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलत आहेत. उद्धव ठाकरे गटाला हिंदुत्वावर बोलण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यांनी हिंदुत्व सोडल्याने एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार चालविण्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडले. सावंत, विनायक राऊत यांना उद्देशून राणे यांनी ‘तु खाली बस रे, तुझी औकात नाही.’ असे वक्तव्य केले. त्यावर पीठासनी अधिकाऱ्यांनी राणेंना वैयक्तिक टिप्पणी करू नये, असे बजावले.
ठाकरे गटाला हिंदुत्वाचा अभिमान आहे तर 2019मध्ये तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही भाजपला धोका देऊन शरद पवार यांच्याकडे गेलात. मी 1967 पासूनचा शिवसैनिक आहे, असं नारायण राणे म्हणाले. ते ऐकताच विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे राणे अधिकच खवळले. अरे बस… मागे बस… असं राणे विरोधकांना म्हणाले. राणे यांच्या या भाषेवर लोकसभा अध्यक्षाने आक्षेप घेत त्यांना थांबण्यास सांगितलं.
