महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कार्यकर्ते-पदाधिकारी संभ्रमावस्थेत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची आगामी दिशा स्पष्ट केली. ‘‘कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही. भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. लढेन, पण विचारधारेशी कदापि तडजोड करणार नाही,’’ अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मंगळवारी मांडली.
राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना पवार यांनी पक्षाची आगामी वाटचाल स्पष्ट केली. खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह याबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगावर दबाव आणून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात आले तसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या दबावाला घाबरणार नाही. नाव आणि चिन्ह नसले, तरी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले जाईल. विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे भाजपला साथ देण्याचा प्रश्नच येत नाही. लढून नव्याने पुन्हा सर्व काही उभे केले जाईल’’, अशा शब्दांत पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
ऑगस्टअखेरीस पुण्यात सभा ऑगस्टअखेरीस पवार यांची पुण्यात सभा होणार आहे. सभेचे ठिकाण आणि वेळ येत्या काही दिवसांत निश्चित करण्यात येईल, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातच ही सभा होणार असल्याने या सभेत पवार काय बोलणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.