यंदाचा हा महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना! युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । यंदा जुलैने मागील सर्व उन्हाळय़ातील उष्णतेच्या उच्चांकाचे विक्रम मोडले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे, असे युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेने जाहीर केले. युरोपीयन महासंघाच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सव्‍‌र्हिस’ अवकाश मोहीम प्रकल्पाच्या शाखेने मंगळवारी जाहीर केले की जुलैत सरासरी जागतिक तापमान १६.९५ अंश (६२.५१ अंश फॅरेनहाइट) सेल्सिअस नोंदवले गेले. जे २०१९ मध्ये नोंदवलेल्या सर्वोच्च सरासरी तापमानापेक्षा एक तृतीयांश (०.३३) अंश सेल्सियसने जास्त (अंश फारेनहाइटचा सहा दशांश) आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की जागतिक तापमानाचा विक्रम सर्वसामान्यपणे एका अंशाच्या १०० व्या ते दहाव्या भागाच्या फरकाने मोडले जातात, या तुलनेत हा फरक असामान्य आहे. ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सव्‍‌र्हिस’च्या उपसंचालिक समंथा बर्गेस यांनी सांगितले की, उष्णतेच्या या विक्रमामुळे मानवजीवन आणि ग्रह दोघांवरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे वारंवार हवामानात टोकाचे प्रतिकूल बदल घडतात.

अमेरिकेच्या नैऋत्य भागात आणि मेक्सिकोत उष्णतेची प्राणघातक लाट पसरली आहे. कोळसा, तेल आणि नैसर्गिक जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे वातावरणात हे टोकाचे बदल झाल्याचा ठपका शास्त्रज्ञांनी ठेवला आहे. २ जुलैपासून दिवसाचे कमाल तापमान पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात होते. तापमानातील फरक इतका मोठा होता की ‘कोपर्निकस’ आणि जागतिक हवामान संघटनेने जुलै महिन्याच्या अखेरीसच घोषित केले होते, की हा कदाचित आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना असू शकतो. त्याला आता अधिकृतपणे पुष्टी मिळाली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२३ मध्ये, औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत सरासरी १.५ डिग्री सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली.

‘कोपर्निकस’ संस्थेने सांगितले, की जुलै महिना खूप उष्ण होता आणि जुलै २०२३ मध्ये जुलै १९९१ ते जुलै २०२० पर्यंतच्या सरासरी तापमानापेक्षा ०.७ अंश जास्त तापमान नोंदवले गेले.

सागरी तापमानात वाढ
उपलब्ध आकडेवारीनुसार, जगातील महासागरांचे तापमान गेल्या ३० वर्षांच्या तुलनेत अर्ध्या अंशाने जास्त नोंदवले गेले आणि उत्तर अटलांटिक महासागराचे सरासरी तापमानापेक्षा १.०५ अंशाने जास्त तापमान होते. अंटार्क्र्टिक समुद्रात या वर्षी सरासरीपेक्षा १५ टक्के कमी सागरी हिमाचे प्रमाण आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *