महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतही शाकिब अल हसन बांगलादेश संघाचे नेतृत्व करेल. एकदिवसीय कर्णधारपद मिळाल्यानंतर शाकिब आता तिन्ही फॉरमॅटसाठी संघाचा कर्णधार बनला आहे. तमीम इक्बालच्या जागी शाकिबला कर्णधारपद मिळाले आहे. गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तमीम इक्बालने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
बीसीबी अध्यक्ष काय म्हणाले?
शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत वनडे संघाचा कर्णधार म्हणून शाकिब अल हसनच्या नावाची घोषणा केली. ते म्हणाले, “शाकिब अल हसन आशिया कप, न्यूझीलंड मालिका आणि विश्वचषकासाठी कर्णधार असेल. तो सध्या लंका प्रीमियर लीग खेळण्यासाठी श्रीलंकेत आहे, तो परतल्यावर त्याच्याशी बोलू. त्याच्या दीर्घकाळाच्या नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचे आहे. काल त्याच्याशी फोनवरही बोललो, पण वैयक्तिक बोलणंही बरं होईल.”
शाकीबकडे कर्णधारपद येत-जात राहिले –
शाकिब आता तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. त्याने गेल्या वर्षी कसोटी आणि टी-२० चे कर्णधारपद स्वीकारले. शाकिबने २००९ ते २०११ दरम्यान ४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी बांगलादेशने २२ सामने जिंकले आहेत. आयसीसी वनडे आणि टी-२० क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू शाकिबला त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शकीबने आतापर्यंत १९ कसोटी आणि ३९ टी-२० आणि ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे. २०१७ मध्ये तो कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला होता.