भाज्यांच्या दरात घसरण, किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर; वाचा सविस्तर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढण्यास सुरुवात झाल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. श्रावणातच भाजीपाल्याच्या दरात उतरण सुरू झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

लांबलेला पाऊस आणि त्यानंतर सलग लागून राहिलेल्या पावसामुळे भाजीपाल्याच्या लागवडीवर परिणाम झाला व बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. त्यातूनच दर वाढले. टोमॅटो घाऊक बाजारातच ८० ते ९० रु. प्रतिकिलो, हिरवी मिरची ७० ते ८० रु. किलो, मटारच्या शेंगा १०० ते १४० रु. किलोपर्यंत पोहोचल्या. कोथिंबिरीची एक जुडी घाऊक बाजारातच ३० रु.वर पोहोचली होती. पालेभाज्या तर बाजारातून गायबच झाल्या होत्या.

किरकोळ बाजारात हिरवी मिरची २०० रु. किलो, मटार २०० रु., आले २०० रु., भेंडी ८० ते ९० रु., फरसबी १२० रु., गवार ८० रु., शिराळी दोडकी ८० रु., कारली ८० ते १०० रु., सुरण ८० रु. किलो असा भाव होता. कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी ५० रु. मोजावे लागत होते. इतर पालेभाज्या तर बाजारातून हद्दपारच झाल्या होत्या. मेथीची जुडी ३० ते ४० रु.पर्यंत पोहोचली होती. आता मात्र भाज्यांच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कोथिंबिरीची जुडी आता २० रुपये झाली आहे. तर मेथीचा दरही २० रुपयांवर आला आहे. पालक, शेपू, मुळा, कांदापात आता जुडीमागे २० ते २५ रु.ना मिळू लागले आहेत.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर (प्रति किलो)

मटार : १०० रु.

टोमॅटो : १०० रु.

सिमला मिरची : ६० रु.

हिरवी मिरची : ६० ते ८० रु.

कारली : ६० रु.

गवार : ८० रु.

वांगी : ६० रु.

भोपळा : ५० ते ६० रु.

भेंडी : ६० रु.

चवळी शेंग : ८० रु.

फ्लॉवर : ६० रु.

कोबी : ५० ते ६० रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *