येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच, राज्यातील अवकाळी पाऊस १९ नंतर ओसरेल, असाही अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.

दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात १९ मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो. दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात येते. पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान – निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार आहे.

मान्सूनचे अंदमानातील आगमन

वर्ष— मान्सून आगमन

२०१८— २५ मे
२०१९— १८ मे
२०२०— १७ मे
२०२१— २१ मे
२०२२— १६ मे
२०२३— १९ मे
२०२४— १९ मे

शनिवार, दि. १९ मे दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १ जून या सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावणारा दक्षिण – पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो, यावरच एक जून या तारखेची निश्चिती ठरवली जाईल. म्हणजेच अजून तीन आठवड्यांचा कालावधी लोटायचा आहे. शनिवार, १८ मेपर्यंत अवकाळीचे वातावरण कायम असून, रविवार, १९ मेपासून अवकाळीचा जोरही कदाचित कमी होऊ शकतो. -माणिकराव खुळे, आयएमडीचे माजी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *