महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। पुणे ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. २१) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्य मंडळाच्या ‘mahresult.nic.in’ आणि ‘http://hscresult.mkcl.org’ या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि सीआयएससीई मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतीक्षा लागली होती ती राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या निकालाची. आता ही प्रतीक्षा संपली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंटआउट) विद्यार्थी आणि पालकांना घेता येईल. त्याचप्रमाणे डीजी लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
गुण पडताळणीसाठी असा करा अर्ज
ऑनलाइन निकालानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ”http://verification.mh-hsc.ac.in” या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. ऑनलाइन शुल्क भरता येईल. जुलै-ऑगस्ट मधील पुरवणी परीक्षेसाठी २७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज करता येतील.
पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया
बारावी परीक्षा उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून दिलेल्या नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल, त्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
श्रेणीसुधार योजनेचा असा घ्या लाभ
परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in