महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। राज्यासह कोकणात उन्हाचा पारा चढला असला तरी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची (Konkan Tourist) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे.
चिपळूण : कोकणात सुटीच्यानिमित्ताने आलेले चाकरमानी (Chakarmani) आणि पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक एकत्र सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.
राज्यासह कोकणात उन्हाचा पारा चढला असला तरी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची (Konkan Tourist) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अवकाळी पाऊस त्रास देत असल्यामुळे चाकरमानी आणि पर्यटक शहराकडे वळले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेची तिकीट मिळत नाहीत. काही रेल्वे उशिराने धावत आहेत.
या त्रासाला कंटाळून चाकरमान्यांनी खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून महामार्गावर रहदारी वाढली आहे. परशुराम घाट ते कशेडी घाटापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागत आहे. हातखंबा ते चिपळूणच्यादरम्यान महामार्गावर तीच अवस्था आहे. आरवलीपासून पुढे हातखंबापर्यंत रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण झाले आहे.
त्यावरून वाहतूकही सुरू आहे; मात्र काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूने वाहने ये-जा करीत असल्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्यामुळे एखादा वाहनचालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो आणि कोंडी होते. संगमेश्वर, आरवली, माखजन येथे वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या दरम्यान होणाऱ्या वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात असणे गरजेचे आहे; मात्र वाहतूक पोलिसांचे पथक केवळ वाहने तपासण्यापलीकडे काहीच करत नाहीत.
वाहतूक पोलिसांची करडी नजर
लोटे आणि कशेडी टॅप येथील वाहतूक पोलिस जागोजागी थांबलेले आहेत. ते वाहने थांबवून वाहनचालकांकडून कागदपत्रांची तपासणी करतात. ज्यांनी कर भरला नसेल किंवा एखाद्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. सीटबेल्ट, हेल्मेटच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवरही वाहतूक पोलिसांची बारकाईने नजर असते. वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवावी, अशी मागणी आता प्रवाशांमधून होत आहे.