महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। आरोग्य विमा घेणाऱ्या ग्राहकांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता नव्या नियमांनुसार एका तासांत कॅशलेस उपचारासाठी मंजुरी आणि ३ तासांत डिस्चार्ज मिळणार आहे. आयआरडीएआयने जारी केलेल्या पत्रकात याविषयी माहिती दिली आहे.
आयआरडीएआयने जारी केलेल्या पत्रकानुसार, तीन तासांपेक्षा अधिक वेळ उपचार सुरु राहिल्यास त्याचं बील कंपनीला भरावे लागेल. ‘आरोग्य विम्याची प्रक्रिया सोपी होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात येत आहे,असे विमा नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. कॅशलेस व्यवहारांसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे रुग्णाचा डिस्चार्ज झाल्यानंतरही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ खर्च व्हायचा, यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विमा नियामक प्राधिकरणाने म्हटलं की, इमर्जन्सी प्रकरणात विमा कंपनीने त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी ३१ जुलैपर्यंत या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे, असं पत्रकात म्हटलंय. तसेच रुग्णालयात विमा कंपन्यांना हेल्प डेस्क तयार करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
नव्या पत्रकात काय म्हटलंय?
तसेच नव्या पत्रकात विमा कंपन्यांना कॅशलेस उपचारासाठी निर्णय घेण्यास म्हटलं आहे. कॅशलेस उपाचारांसाठी विमाधारकांनी विनंती केल्यानंतर एका तासांच्या आत निर्णय विमा कंपनीने निर्णय घ्यावा. तसेच रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर तीन तासांत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे विमाधारकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही.
विमाधारक रुग्णाला उशीर झाल्यास त्याच्याकडून रुग्णालयाने शुल्क आकारल्यास, ते विमा कंपनीला भरावे लागेल. विमाधारकांना सहज पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. एखाद्या विमाधारकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास विमा कंपनी याबाबत जलदगतीने प्रक्रिया करेल.