Weather Forecast : वातावरणात बदल ; राज्यात ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। पुणे ।। रखरखतं ऊन आणि उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या मान्सूनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो केरळमध्ये दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे वेळेपूर्वीच मान्सून केरळात धडकला आहे. महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये धडकताच वातावरणात मोठा बदल आहे.

अनेक भागातील तापमानात काहीशी घट झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गुरुवारी (३० मे) केरळ, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागात पाऊस झाला.

यासह लक्षद्वीप, दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण तमिळनाडूतही पावसाच्या सरी बरसल्या. आता येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे आटोपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवार आणि उद्या शनिवारी मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

गुरुवारी (ता. ३०) मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तापमानात काहीशी घट झाली झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी होणार दाखल?
मौसमी वारे दरवर्षी केरळात १ जून ते ३ जून या कालावधीत दाखल होत असतात. त्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर मुंबईसह संपूर्ण राज्याला मौसमी वारे व्यापतात. यंदा ३० मे रोजीच मान्सून केरळात दाखल झाला. त्यामुळे राज्यात ५ किंवा ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *