Maharashtra Weather News : मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुन ।। प्रचंड उकाड्यानं हैराण कराणारा मे महिना मागे राहिला असून, आता जून महिन्याची सुरुवात झाली आहे. ओघाओघानं आता पावसाची, मान्सूनची प्रतीक्षा शिखरावर पोहोचली आहे. असं असलं तरीही अद्याप मात्र राज्यापासून पाऊस काहीसा दूर आहे हीच वस्तूस्थिती. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यात कुठं उष्णतेची लाट, तर कुठं उष्ण आण दमट स्थितीच पाहायला मिळणार आहे.

पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या (Konkan) कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. विदर्भात ब्रह्मपुरी इथं तापमान 46.9 अंशांवर पोहोचलं असून त्याचा दाह सोसेनासा झाला आहे. हवामानाची ही स्थिती पाहता सध्या कोकणात दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.

(Mumbai) मुंबई, ठाणे (Thane), पालघर, रायगड इथं मात्र आकाश निरभ्र राहणार असून, उष्णतेचा दाहसुद्धा वाढणार आहे. राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या वेशीपासून मान्सून किती दूर? (Maharashtra Monsoon)
उकाडा दर दिवसागणिक तीव्र होत असतानाच राज्यात मान्सूनच्या आगमनाची वाट सगळेच पाहताना दिसत आहेत. सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या अनुषंगानं राज्यात पोषक वातावरण पाहायला मिळत असून, बंगालच्या उपगासगरावर असणारी (Monsoon) मान्सूनची उपशाखा आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. केरळासह देशाच्या पूर्वोत्तर राज्यांकडेही मान्सून एकाच वेळी सक्रिय झाला होता. परिणामी सध्या हिमालय क्षेत्र आणि सिक्कीममध्ये मान्सून वेगवान असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या तीन दिवसांमध्ये अरबी समुद्रातील मान्सूनही वेग धारण करू शकतो.

पुढील 48 तासांमध्ये मान्सून अरबी समुद्रासह केरळ, अंदमानचा उर्वरित भाग यांसह कर्नाटक आणि लक्षद्वीपचा काही भाग व्यापत बंगालच्या उपसागरात प्रवेश करेल. केरळात मान्सूननं आणखी जोर पकडल्यानंतर तो साधारण 8 ते 10 दिवसांत पुढे कूच करत कोकणमार्गे महाराष्ट्राच्या वेशीत प्रवेश करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *