महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुन ।। कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना शनिवारी (एक जून) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात कारचालकाचा रक्त नमुना बदलण्यासाठी दिलेले रक्त माझेच असल्याची कबुली अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांसमोर दिली. त्यानंतर आईसह वडिलांनाही या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शिवानी अगरवाल यांच्या रक्ताची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
![]()
अल्पवयीन मुलाच्या आईचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र, त्या पसार झाल्या होत्या. मात्र, शिवानी अगरवाल या घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी साडेसात वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अटकेची कायदेशीर कारवाई केली. येरवडा पोलिस ठाण्यात दाखल अपघाताच्या मूळ गुन्ह्यात त्यांना आरोपी करण्यात आले.