भोसरीत बांगलादेशी नागरिकाने केले मतदान; पासपोर्ट काढून बांगलादेश वारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुन ।। पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी पथकाने भोसरीत जेरबंद केलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी एकाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघासाठी मतदान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर त्याने 2019 मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याच्यासह आणखी एकाने पासपोर्टचा वापर करून विमानाने बांगलादेशची वारी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

शामीम नुरोल राणा (वय 26, रा जमलपूर, ढाका, बांगलादेश) असे घुसखोरी करणाऱया बांगलादेशीचे नाव आहे. दहशत विरोधी पथकाने 25 मे रोजी भोसरीतील शांतीनगर येथे छापा टाकून शामीम याच्यासह राज उर्फ सम्राट सधन अधिकारी (वय 27), जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय 38), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा (वय 26), आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय 32) या पाच बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद केले होते. हिंदुस्थानात घुसखोरी केल्यानंतर शामीम पुण्यात आला. सुरूवातीला काही दिवस हडपसर येथे राहत होता. गेल्या आठ वर्षापासून तो भोसरीत वास्तव्यास आहे. त्यानंतर त्याचे इतर साथीदारही भोसरीत आले.

शामीम हा आठ वर्षापासून भोसरीत राहत आहे. त्याने 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 13 मे रोजी भोसरीत मतदान केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, शामीम व जलील यांच्याकडे पासपोर्ट असून, दोघेजण विमानाने बांगलादेशलाही जाऊन आले आहेत. त्यांना दोन जणांनी बनावट कागदपत्रे बनवून दिली आहेत. त्यांचाही कसून शोध सूरू आहे. लवकरच ते आरोपीही ताब्यात येतील.
– अशोक केंद्रे, (पोलीस उपनिरीक्षक)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *