महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुन ।। सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिलेला २१ दिवसांचा अंतरिम जामीन संपल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले. मात्र, त्यानंतर अंतरिम जामीन मिळावा, यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी घेताना दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यूच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून, अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
अरविंद केजरीवाल यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. राऊज ॲव्हेन्यूच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ केली आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव ७ दिवसांच्या जामीनासाठी अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली अंतरिम जामिनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. असे असले तरी न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा ईडीचा युक्तिवाद
यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाच्या काळात वैद्यकीय चाचण्याऐवजी प्रचारसभांना संबोधित केले असून, ते आजारी नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांचे वजन सात किलोंनी घटले नसून एक किलोने वाढल्याचा दावा केला.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना १९९४ पासून मधुमेहाचा आजार असून, कलम २१ अंतर्गत त्यांना राज्यघटनेकडून जगण्याचा अधिकार लाभला आहे. त्यांच्या शरीरात किटोनचा स्तर वाढला असून, त्याचा अर्थ मूत्रपिंड सामान्यपणे कार्यरत नाही. केजरीवाल यांच्या शरीरात मोठे बदल होत असल्याचे संकेत असून, अशा स्थितीत त्यांच्या आरोग्याला अपाय झाल्यास जबाबदारी कोणाची असेल, असा सवाल केजरीवाल यांचे वकील एन. हरीहरन यांनी केला.