महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुन ।। भाजपचे हेविवेट नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करणे शक्य नाही हा भ्रम या निवडणुकीतून दूर झाला. मला वर्षभराचा कालावधी मिळाला असता आणि धनशक्ती सोबत असती तर निश्चितच त्यांचा पराभूत करू शकलो असतो, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केला.
नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे असा थेट सामान रंगला होता. गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडूण येण्याचा दावा केला होता. कोट्यवधींची कामे केली, लोकांना मदत केली त्यामुळे आपल्याला नागपूरकर भरभरून साथ देतील असे त्यांना वाटत होते. मी नागपूकरांसाठी जे काही केले ते बघता घरोघरी जाऊन मतदारांना हात जोडण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते.
याकडे लक्ष वेधून ठाकरे यांनी शेवटी घरोघरीच नव्हे तर गल्लोगली फिरावे लागल्याचे सांगितले. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत अनुक्रमे तीन लाख आणि दोन लाख १७ हजारांचे मताधिक्य त्यांना मिळाले होते. यात निम्म्याने घट झाली आहे.
पाच लाख सोडा अडीच लाखांचेही मताधिक्य त्यांना टिकवता आले नाही. अवघ्या एक लाख ३७ हजारांच्या मताधिक्यांनी ते निवडूण आले आहेत. त्यांचे मताधिक्य ८० हजाराने कमी करण्यात आपल्याला यश आले. ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले.
मताधिक्य भेदता आले नाही
मी उमेदवाराच्या स्पर्धेत नव्हतोच. लोकसभा लढण्याचा विचारही केला नव्हता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पंधरा दिवासपूर्वी आपले नाव जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि नियोजनासाठी वेळ अपुरा पडला. काँग्रेसने आधीच कल्पना दिली असती तर निश्चितच त्यांचा पराभव केला असताही असेही विकास ठाकरे यांनी सांगितले.
मतदान आटोपल्यानंतर ठाकरे यांनी आपण एक लाखांच्या मताधिक्याने निवडूण येणार असल्याचा दावा केला होता. महाविकास आघाडीमुळे शहरात मतभेद नव्हते. संविधानाचा मुद्दा तापल्याने अनुसूचित जाती, जामती, मुस्लिम तसेच हलबा समाज महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणात वळेल असे दावे केले जात होते. निकालाची आकडेवारी बघता यात तथ्य असले तरी गडकरी यांचे अडीच लाखांचे मताधिक्य ठाकरे यांना भेदता आले नाही.