महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुन ।। महाबळेश्वर : येथील अग्रवाल कुटुंबाच्या एमपीजी क्लब या रिसॉर्टमधील आठहून अधिक आलिशान टेंट व कॉटेजेसवर आज सकाळी पालिका प्रशासनाने हातोडा मारला. मोठ्या पोलिस बंदोबस्तात रिसॉर्टमधील खोल्या जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्या.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने नुकतेच पोलिस बंदोबस्तात एमपीजी क्लब रिसॉर्टमधील ३२ आलिशान रूम, आठहून अधिक वूडन कॉटेजेसमधील रूम व जिम, स्पा, किचन स्टाफरूम, इतर खोल्यासह मुख्य प्रवेशदारदेखील सील करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डुडी यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली होती.
गेल्या एप्रिल महिन्यात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या रिसॉर्टबाबत एक तक्रार दाखल केली. त्यानंतर पुणे येथे कल्याणीनगर येथील पोर्शे अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाबाबतची नवनवी माहिती उघडकीस येत होती. महाबळेश्वर येथील शासकीय मिळकतीमध्ये असलेली एमपीजी क्लब रिसॉर्टबाबतचे प्रकरण सर्वांसमोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डुडी यांना दिले.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने रिसॉर्टमधील बारदेखील सील केला होता. काही दिवसांपूर्वी या रिसॉर्टला प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी कॉटेजेस टाळे ठोकून सीलबंद केले होते.
रहिवासी वापरासाठी असलेल्या मिळकतीमध्ये रिसॉर्ट म्हणून वाणिज्य वापर सुरू असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. रिसॉर्ट परिसरातील आलिशान टेंट साधारण दोन- तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. हे विनापरवाना असल्याचे उघड झाले होते. आजअखेर प्रशासनाने या टेंटवर हातोडा मारला. मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई झाली. जेसीबीच्या साहाय्याने टेंट पाडण्यात आले आहेत.