![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुन ।। राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर १४ जूनपासून राज्यात पावसामध्ये काही खंड पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव, लातूर, बुलढाणा, पुणे, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे.
कोकणात पावसाचा प्रभाव कमी
कोकणात मागील चार ते पाच दिवसांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. या पावसामुळे अनेक ठिकाणी भात खाचरे भरली असून भाताच्या रोपवाटिकांच्या कामांना वेग आला आहे.
मध्य महाराष्ट्रात कमी अधिक पाऊस :
मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची उघडिप दिली असून काही प्रमाणात ढगाळ वातावरण कायम आहे. नाशिक, सोलापूर, नगर भागात पावसाचा जोर कमी अधिक आहे. खानदेशात ढगाळ वातावरण आहे. नाशिकमध्ये गेल्या बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. तर पाच दिवसांपासून चांदवड,नांदगांव, इगतपुरी, देवळा, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार :
मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, धाराशिव व परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर अत्यंत कमी राहिला. बहुतांश मंडलांत पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची होती.
विदर्भातही जोर
विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत मॉन्सूनचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बसरत आहेत. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
