महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। पावसाने पाकिस्तानला बुडवल्याने शेजाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घात करणारा ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले होते आणि दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते, परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १-१ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली. यासह त्यांनी २०२६ मध्ये भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रताही निश्चित केली.
पाकिस्तान स्पर्धेबाहेर होताच शेजारील देशातील माजी खेळाडू बाबर आझमच्या संघावर तुटून पडले. माजी खेळाडू मोहम्मद हफिजने बोचरी टीका करताना पाकिस्तानी संघाचा चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला. तिसऱ्या सामन्यात कॅनडावर विजय मिळवून पाकिस्तान शर्यतीत कायम राहिला होता, परंतु पावसाने शेजाऱ्यांना बुडवले.
Qurbani Kay Janwar Hazir Hon… ???? ????????????????????….. #PakistanCricket
— Mohammad Hafeez (@MHafeez22) June 14, 2024
मोहम्मद हफिजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट करत म्हटले की, कुर्बानी के जानवर हाजीर हो. पाकिस्तानी संघाने अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडून पराभव पत्करल्याने शेजाऱ्यांची खिल्ली उडवली गेली. अशातच आता पाकिस्तानला पावसाने बुडवले.
पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. १० वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी ११.४६ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत ५-५ षटकांची खेळवण्यात येणार होती. ११ वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला.