महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। यंदा राज्यात मान्सून वेळीआधीच दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी धरणांनी तळ गाठला असून अनेक शहरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या धरण साखळीत केवळ 3.76 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर पुणे शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पुणे शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.
गेल्यावर्षी आजच्या दिवशी खडकवासला प्रकल्पात ५.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मात्र, यावर्षी हा पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. अधून मधून जलदुस्तीच्या कामांसाठी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंदही ठेवण्यात येत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला होता. सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे पुणेकर चांगलेच सुखावले होते. आता शहरातला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा जमा होईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
खडकवासला प्रकल्पातील धरणाक्षेत्रातील पाणीसाठा
टेमघर: 0.05 टीएमसी
वरसगाव: 1.44 टीएमसी
पानशेत: 1.46 टीएमसी
खडकवासला: 0.81 टीएमसी
एकूण: 3.76 टीएमसी