महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। पुणे पोर्शे अपघातानंतर शासनाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवत दोघांना चिरडलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलत बचाव करण्याचाही प्रयत्न झाला. या सर्व प्रकरणानंतर शासनाने पार-पब प्रवेशासाठीचे वयाबाबतचे नियम कठोर केले आहेत.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर बार-पबमध्ये प्रवेश करण्याआधी वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक असणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला सरकारी ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. बार-पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश मिळून नये, यासाठी आता प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासलं जाणार आहे.
वाईन-बिअर पिण्यासाठी २१ वर्ष वय तर दारु पिण्यासाठी २५ वर्ष वय असणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयानंतर बार-पब मालकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारु न देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यास मुंबई-पुण्यात सुरुवात झाली आहे.
शिवानी आणि विशाल अग्रवालची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवानी, विशाल अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. शिवाजीनगर कोर्टाने याबाबत हा निर्णय दिला आहे. या तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ससून ब्लड रिपोर्ट प्रकरणी तिघांची मागील शुक्रवारी पोलीस कोठडी संपली. त्यानंतर तिघांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.