मी आधी धनगर समाजाचा, मग आमदार : गोपीचंद पडळकरांचे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । ‘मी पहिला धनगर आणि नंतर आमदार’ असे स्पष्ट वक्तव्य करत गोपीचंद पडळकर यांनी ‘आपला नाद करू नका,’ असे सांगत आपल्याच पक्षातील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे. याबरोबरच आपण कधीही बेताल वक्तव्ये केली नाहीत, रोखठोक भूमिका जनतेसमोर मांडतो, असा दावाही त्यांनी केला.

सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. अशा या राजकीय परिस्थितीतच धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी ठेवून यापुढे आपण राजकारणात सक्रिय भूमिका बजावू, असे सांगत गोपीचंद पडळकर म्हणाले की, २०१३-१४ मध्ये समाजाच्या आरक्षणासाठी बिरोबाच्या बनात भव्य मेळावा घेऊन तत्कालीन सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने फडणवीस यांनी पडळकरांना आमदारकी बहाल केली तरीही त्यांनी ‘मी पहिला धनगर आणि नंतरच आमदार’ अशी भूमिका घेतली आहे.

सर्वोच्च नेत्यांनी फटकारले, पण त्याचा परिणाम नाहीच

चार दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच फडणवीसांना निवेदन दिल्यावर पडळकरांनी ‘अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे,’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने त्यांच्याविरुद्ध आंदोलन केले. फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना फटकारले. पण त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे पडळकरांनी अप्रत्यक्षरीत्या फडणवीसांना, भाजपला आव्हान दिल्याची चर्चा धनगर समाजात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *