महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुन ।। राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील ३ ते ४ तासांत या भागात पावसाची शक्यता
पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात येत्या ३-४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता
नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पुणे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर व काहीसा ओसरला होता. आता पुन्हा मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः ढगाळ राहत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज ह वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवार (ता. २४) नंतर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.