महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुन ।। केंद्र सरकारच्या एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि निवृत्तिवेतनाचा आढावा घेण्यासाठी सरकारने लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. या दरम्यान आता केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असून त्यापूर्वी राष्ट्रीय परिषदेने कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून ८व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, भत्ता, पेन्शन आणि इतर लाभांचा आढावा घेईल. राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला प्राधान्य देण्याचे सरकारला आवाहन केले आहे.
आठव्या वेतन आयोगाचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो. २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे आता २०२६ मध्ये आठवा वेतन अयोग्य स्थापन होण्याची शक्यता असून आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २५ ते ३५ टक्के वाढ अपेक्षित असताना असे झाल्या मूळ वेतन दरमहा २६,००० रुपये होईल. त्याचवेळी, फिटमेंट फॅक्टर देखील २.५७ वरून ३.६८ पर्यंत वाढू शकतो.
कर्मचाऱ्यांची कमाई अन् महागाईत फरक
करोना संकटानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांची कमाई आणि महागाई या दोघांमध्ये मोठी तफावत दिसून आली असून यामुळे DA (महागाई भत्ता) आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी तफावत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यात आली होती, त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आवश्यक आहे. वेतन आयोग सरकारद्वारे नियुक्त केली जाणारी एक संस्था आहे जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची पगार रचना, भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेते आणि त्यामध्ये बदल करण्याची शिफारस करते. वेतन आयोग महागाईसारख्या बाह्य घटकांचा विचार करून आवश्यक समायोजन प्रस्तावित करते.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
यापूर्वी दर दहा वर्षांच्या अंतराने वेतन आयोग स्थापन करण्यात आला असून ८वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पर्यंत स्थापन होण्याची शक्यता आहे मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याचवेळी, मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्याने एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत उत्सुकता वाढली आहे.