अटल सेतू पुलाला तडे ! पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचा एमएमआरडीएचा खूलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. सदर पोहाचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा खूलासा एमएमआरडीएतर्फे करण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने २० जून २०२४ रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५ अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या असून त्या त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज ४ चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *