महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुन ।। राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 23) सुपर 8 फेरीच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी मात करत पराभवाची धूळ चारली. गुलाबदिन नायबने 4 बळी घेतले. तर नवीन-उल-हकने 3 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिला विजय ठरला आहे.
किंग्सटाउन येथील अर्नोस वेल मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 19.2 षटकांत 127 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 21 धावांनी गमावला.
क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कांगारूंना 24 जून रोजी होणाऱ्या सुपर-8 मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव करावा लागेल.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अनोखा विक्रम रचला. त्याने सलग दुस-या सामन्यात एकापाठोपाठ एक तीन विकेट घेऊन ऐतिहासिक हॅटट्रिक साधली. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. रविवारी (दि. 23) सुपर 8 फेरीतील अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात कमिन्सने ही किमया केली. कमिन्सने याआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक पूर्ण केली होती. तो आता स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत पोहचला आहे.