ST Bus: नव्या ‘लालपरी’साठी दिवाळीचा मुहूर्त; २४०० साध्या एसटी खरेदीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुन ।। नव्या लालपरीतून अर्थात, साध्या एसटीगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या साध्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे २४०० तयार गाड्या एसटी ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील तीनशे गाड्यांचा पहिला टप्पा दिवाळीत प्रवासीसेवेत दाखल होणार आहे.

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यांत गाड्यांची कमतरता आहे. सध्या धावत्या असलेल्या गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाल्याने त्यांच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये सातत्याने वाढ होते. यामुळे साध्या २२०० अधिक दोनशे अशा एकूण २४०० गाड्या खरेदीचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला होता. प्रस्ताव मंजूर करून २०२३-२०२४च्या अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.

लोकसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत तब्बल वर्षभर तयार गाड्या खरेदीचा प्रस्ताव रखडला होता. तयार गाड्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. आता त्यावर एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाली आहे. येत्या काही दिवसांत अशोक लेलँड कंपनीला कार्यादेश देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रारूप बसची एसटी महामंडळाच्या पथकांकडून चाचपणी करण्यात येणार आहे. त्यानंतर तीनशे गाड्या प्रवासीसेवेत दाखल होणार आहेत. संपूर्ण २४०० गाड्या मार्च २०२५पर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होईल, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *