उष्माघाताचा कहर : हज यात्रेतील मृतांची संख्या १,३०१ वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। सौदी अरेबियात उष्‍माघाताने मृत्‍युमुखी पडलेल्‍या हज यात्रेकरूंच्या संख्‍या १३०० हून अधिक झाली आहे. १,३०१ मृतांपैकी ८३ टक्के हे अनधिकृत यात्रेकरू होते. ते कडक उन्हात मक्का या पवित्र शहरात आणि आजूबाजूला हजचे विधी पार पाडण्यासाठी लांबचे अंतर चालले होते, अशी माहिती सौदीचे आरोग्‍य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल यांनी दिली.

सौदी अरेबियाच्‍या सरकारी टीव्ही अल एखबरियाशी बोलताना मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल म्‍हणाले की, उष्‍माघाताचा त्रास झालेले 95 यात्रेकरू रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी काहींना विमानाने राजधानी रियाध येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे. ‘एपी’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृत यात्रेकरूंची ओळख पटवण्यात उशीर झाला. कारण यातील बहुतांश यात्रेकरुंकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती.

मृतांमध्‍ये ९८ भारतीय
यावर्षी हजदरम्यान ९८ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या इजिप्शियन यात्रेकरूंची आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या सर्व लोकांच्या मृत्यूचे कारण आजारपण आणि वृद्धत्व असल्याचे सांगितले आहे. 660 हून अधिक इजिप्शियन हज यात्रेकरूंचा मृत्‍यू झाला आहे. कैरोमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, 31 यात्रेकरु वगळता अन्‍य विनानोंदणीच मक्‍केमध्‍ये आले होते. अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला पाठवणाऱ्या 16 ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. इजिप्तमध्ये, स्थानिक एजंट आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना खर्च वाचवण्यासाठी आमिष दाखवतात आणि त्यांना पर्यटक व्हिसावर हज करण्यासाठी सौदी अरेबियाला पाठवतात. नोंदणीअभावी या यात्रेकरूंना हजची सुविधा मिळत नाही.

यंदा 8.3 लाखांहून अधिक भाविकांनी केली हज यात्रा
सौदीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 2024 मध्ये 18.3 लाखांहून अधिक मुस्लिमांनी हज यात्रा केली. यामध्‍ये २२ देशांतील १६ लाखांहून अधिक लोक आणि सौदी अरेबियाचे 2,22,000 नागरिक आणि रहिवासी यांचा समावेश होता. मक्काच्या अल-मैसम भागात बहुतेक लोकांचा मृत्यू झाला. इजिप्तने यावर्षी 50,000 हून अधिक नोंदणीकृत यात्रेकरू सौदी अरेबियाला पाठवले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *